बंगळुरू (कर्नाटक)- लॉकडाऊन काळात स्थलांतरित श्रमिकांना बस आणि ट्रेनच्या सहायाने त्यांच्या राज्यात पोहचविण्याची मुभा गृहमंत्रालयाने दिली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून बंगळुरू-भूवनेश्वर विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. आज सकाळी या ट्रेनने १ हजार १९० श्रमिकांना भूवनेश्वरला पाठविण्यात आले आहे.
श्रमिक ट्रेन सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी बंगळुरूच्या चिकबानावारा रेल्वे स्थानकावरून रवाना झाली होती. यात ११९० स्थलातरित श्रमिक असल्याची माहिती दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या एक महिन्यापासून हे श्रमिक शहरातील पूर्व भागातील मदत शिबिरांमध्ये वास्तव्यास होते, त्यांना रेल्वे स्थानकावर पोहोचविण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष बसची व्यवस्था केली होती.
काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी चर्चा केली होती. त्यात दोघाही मुख्यमंत्र्यांनी श्रमिकांना त्यांच्या मूळ राज्यात पाठविण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर, आज श्रमिकांना विशेष ट्रेनच्या सहायाने भूवनेश्वरला पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा- पाटणा प्राणीसंग्रहालयाच्या फेसबुक,युट्युब चॅनेलवर 9 लाख लोकांनी दिली भेट