नवी दिल्ली - उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षामध्ये जागावाटप निश्चित झाले आहे. राज्यातील एकूण ८० लोकसभा मतदारसंघापैकी ३७ जागांवर समाजवादी तर, ३८ जागांवर बहुजन समाज पक्ष निवडणूक लढेल. राष्ट्रीय लोकदलासाठी ३ जागा सोडण्यात आल्या आहेत.
अखिलेश यादव आणि मायावती यांनी गुरुवारी जागावाटपावर शिक्कामोर्तब केले. यावेळी दोन्ही पक्षांचे मतदारसंघही निश्चित करण्यात आले आहेत. अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघात सपा बसपा आघाडी उमेदवार उभे करणार नाही. नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीमधून समाजवादी उमेदवार उभा करणार आहे.
दरम्यान, समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी या आघाडीवर नाराजी दर्शवली आहे. लखनौमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. बहुजन समाज पक्षाला अर्ध्या जागा दिल्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समाजवादी पक्षाची मोठी ताकद आपण राज्यात निर्माण केली होती. तीन वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून आपण काम पाहिले. पण, आता पक्षातील लोकच पक्ष कमकुवत करत आहेत असे मुलायमसिंह म्हणाले.