बंगळुरू : दक्षिण-पश्चिम रेल्वेने (एसडब्ल्यूआर) १२ सप्टेंबर पासून सात अतिरिक्त गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी याबाबत माहिती दिली.
बंगळुरू कँटॉन्मेंट ते गुवाहाटी, यशवंतपूर ते बिकानेर, म्हैसूर ते जयपूर, म्हैसूर ते सोलापूर, यशवंतपूर ते गोरखपूर आणि केएसआर बंगळुरू ते नवी दिल्ली या मार्गांवर नवीन गाड्या धावतील. १ एप्रिल २००३पासून सुरू झालेल्या एसडब्ल्यूआर झोनचे मुख्यालय हुबळीमध्ये आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. सर्व सामान्य गाड्या रद्द करण्यात आल्या असून ठराविक मार्गावर विशेष गाड्या सुरू आहेत. त्यामध्ये आता आणखी ४० गाड्यांची भर पडणार आहे. आणखी ४० विशेष गाड्या (दोन्ही मार्गे) सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाने दिली. या विशेष गाड्यांमध्येच वरील सात गाड्यांचा समावेश आहे.
१२ सप्टेंबरपासून या ४० विशेष गाड्या धावणार असून १० तारखेपासून तिकीट आरक्षित करता येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे संचालक विनोद कुमार यादव यांनी दिली. सुरळीत रेल्वे सेवा सुरू होण्याबाबत मागील काही दिवसांपासून शक्यता वर्तविण्यात येत आहेत. मात्र, अनेक राज्यातील कोरोनाचा प्रसार कमी झाला नसल्याने सेवा सुरू करण्यात आली नाही.