सिलिगुरी - अगोदरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. त्यातच भारत-नेपाळ आणि भारत-चीन संबंध ताणले गेले आहेत. या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा उत्तर बंगाल मधून होणाऱ्या चहाच्या निर्यातीवर होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. यासाठी शासनाने वेळीच पाऊल उचलले नाही, तर चहाच्या व्यापाराला मोठा फटाका बसणार असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.
आसाम आणि उत्तर बंगालमधून सीटीसी चहाची चीनमध्ये निर्यात होते. २०१८-१९ वर्षात सुमारे १०.५८ दशलक्ष किलो सीटीसी चहाची निर्यात करण्यात आली होती. याची किंमत सुमारे १८० कोटी होती. तर २०१९-२० मध्ये १२.७१ दशलक्ष टन (२००.१५ कोटी रुपये) चहाची निर्यात झाली होती. चीन वगळता, रशियामध्येही चहाची निर्यात केली जाते. २०१९-२० मध्ये भारतातून रशियामध्ये ४४.७६ दशलक्ष किलो चहा पाठवण्यात आला, ज्याची किंमत ७११.१२ कोटी रुपये होती.
२०१९-२० मध्ये भारतातून एकूण २४० दशलक्ष किलो चहा निर्यात करण्यात आला, ज्याची एकूण किंमत ५,४२७.७८ कोटी रुपये होती. मात्र सध्या चहाची निर्यात अगदीच संथ गतीने सुरू आहे. चहा व्यापारी यासाठी बँक आणि कस्टम कार्यालयांना जबाबदार धरत आहेत. या कार्यालयांमध्ये संथ गतीने काम सुरू आहे, त्यामुळेच चहाची निर्यातही कमी वेगाने होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
"लॉकडाऊन उठल्यानंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरू झाला आहे, मात्र हे काम अगदी कमी वेगात होत आहे. बँकांमधील कागदपत्रांचे व्यवहार लवकर होत नसल्यामुळे, सगळा माल कित्येक दिवस पडून राहत आहे. जर सरकारने वेळीच यात लक्ष घातले नाही, तर इतर देशांमध्ये आपल्या आधी नेपाळ आणि श्रीलंकामधील चहा पोहोचेल. त्यामुळे आपल्या मालाला कुठेच संधी मिळणार नाही", असे मत राजीव लोचन या चहा व्यापाऱ्याने व्यक्त केले.
यासोबतच व्यापाऱ्यांना गलवान खोऱ्यातील झालेल्या प्रकरणामुळे, ताणल्या गेलेल्या भारत-चीन संबंधांचीही चिंता आहे. कारण, त्याचा थेट परिणाम दोन्ही देशांमधील व्यापारावर होताना दिसून येत आहे. अमेरिका-जर्मनी-जपान अशा देशांमध्येही अंतर्गत तणाव आहेत. मात्र त्याचा परिणाम त्यांच्या व्यापारावर होत नाही, असे मत आणखी एका चहा व्यापाऱ्याने व्यक्त केले..