नवी दिल्ली - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील परिस्थितीचा आणि राज्यात कोरोना संकटावर काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे.
दरम्यान, सोनिया गांधी यांनी लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या समस्येकडे पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले. याचबरोबर लॉकडाऊन काळात स्थलांतरित श्रमिकांकडून सरकार रेल्वे प्रवास भाडे आकारत असल्याने त्यांच्यावर सोनिया गांधींनी निशाणा साधला होता. कामगारांचा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस पक्ष उचलेल, अशी घोषणाही त्यांनी केली होती.