नवी दिल्ली - संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (संपुआ) अध्यक्ष सोनिया गांधी येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पारंपरिक रायबरेली मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. यंदा याठिकाणाहून प्रियांका गांधी लढतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, काँग्रेस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनिया गांधी याच येथून लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोनिया गांधी राजकीय निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता त्या निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जात आहे. सोनिया गांधींना अलिकडे आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवेळी त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला नव्हता. पाच राज्यांपैकी केवळ तेलंगणामधील एकाच सभेत त्या सहभागी झाल्या होत्या. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमध्ये त्यांनी एकही सभा घेतली नव्हती, त्यामुळे लोकसभा निवडणूक त्या लढवणार नाहीत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
त्याबरोबरच प्रियांका गांधी काँग्रेसच्या महासचिव झाल्या, त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळाले. रायबरेलीतील जनतेची प्रियांकांशी चांगलीच जवळीक आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये सोनिया गांधींचा प्रचार करताना त्यांनी अनेक सभा घेतल्या आहेत. रायबरेलीतील लोक दिल्लीत आल्यानंतर प्रथम प्रियांका गांधींचीच भेट घेतात.
