नवी दिल्ली - हंगामी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर कथित व्हॉट्सअॅप संभाषणाचा हवाला देत टीकास्त्र सोडले. जे इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे दाखले देतात. त्यांच पितळ आता उघडं पडलयं, असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड झाल्यासंदर्भातील त्रासदायक बातमी वाचली. इतरांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे दाखले देणारे लोक पूर्णपणे उघडे पडले, अशी टीका त्यांनी केली. आज काँग्रेसची सीडब्ल्यूसीची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी शेतकरी आंदोलनावर चर्चा केली. सरकारने शेतकऱ्यांबाबत असंवेदनशीलता व अहंकार दाखवल्याचा आरोपही त्यांनी केला.
संसदेचे अधिवेशन एका आठवड्यात सुरू होणार आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. जनहिताचे अनेक विषय आहेत. ज्यावर पूर्ण चर्चा होणे आवश्यक आहे. शेतकरी आंदोलन सुरूच असून सरकार फक्त चर्चेच्या फेऱ्याच घेत आहे, असेही त्या म्हणाल्या.
कृषी कायदे घाईघाईने बनवले गेले. संसदेला त्यांच्या प्रभावांचे आकलन करण्याची संधी दिली गेली नाही. हे कायदे अन्नसुरक्षेचे पाया नष्ट करतील, त्यामुळे काँग्रेसने या कायद्यांचा विरोध केला आहे, असे त्या म्हणाल्या. अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबतही त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
अर्णब गोस्वामी कथित व्हॉट्सअॅप संभाषण प्रकरण -
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे.