लखनऊ - उत्तर प्रदेशच्या घोसी विधानसभा मतदारसंघातून, मागच्या निवडणुकांमध्ये फागू चौहान निवडून आले होते. त्यांना बिहारचे राज्यपाल पद दिले गेल्यामुळे आता होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी, या मतदार संघातून त्यांच्या मुलाला तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, भाजपने या मतदारसंघातून एका भाजीवाल्याच्या मुलाला तिकीट दिल्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.
या मतदारसंघातून तिकीट मिळण्यासाठी बरेच मोठे नेते प्रयत्नशील होते. मात्र, पक्षाने या सर्वांना डावलून एका भाजीवाल्याच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. विजय राजभर असे या उमेदवाराचे नाव आहे. राजभर हे भाजचे नगराध्यक्ष आहेत. तसेच पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.
हेही वाचा : अजब फतवा : नवरात्र उत्सवात आधार कार्ड सोबत घेवून या; बजरंग दलाचा जातीय 'गरबा'
यावेळी बोलताना, विजय यांनी सांगितले की पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे, त्याला मी नक्कीच सार्थ करेल. ज्याप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन आतापर्यंत काम केले, त्याप्रमाणेच पुढेही काम करत राहू. तसेच, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या 'अंत्योदय' शिकवणीमुळेच आज मी, एक भाजी विक्रेत्याचा मुलगा असूनही निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार बनू शकलो आहे.
विजय यांचे वडील नंदलाल यांनी सांगितले, की विजय यांच्या मेहनतीचेच हे फळ आहे, की पक्षाचे मोठे नेते आणि पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर हा विश्वास दाखवला. इथल्या लोकांनादेखील विजयवर विश्वास आहे, त्यामुळे नक्कीच आम्ही निवडणूक जिंकू अशी आशा आहे.
हेही वाचा : 'काश्मीरमधील लोकांवर बंधने नाहीत, विरोधक चुकीची माहिती देताहेत'