चेन्नई - भारतातील काही लोकांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी आहे, असे वक्तव्य देशाचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. ते चेन्नईमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना, नागरिकत्व सुधारणा कायदा हा अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकता देण्यासाठी लागू करण्यात आले असल्याचेही सांगितले.
श्री रामकृष्ण विजयम या तामिळ मासिकाच्या शताब्दी सोहळा आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाला नायडू उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, की भारतातील काही लोकांना हिंदू या शब्दाची अॅलर्जी आहे. हे चुकीचे असले, तरी त्या लोकांना तसा विचार करण्याचा हक्क आहे, असेही ते म्हणाले. धर्मनिरपेक्षता म्हणजे एखाद्या धर्माचा द्वेष करणे नव्हे, धर्मनिरपेक्षता हा भारतीय संस्कृतीचा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, की आपल्या देशाने नेहमीच छळाला बळी पडलेल्या लोकांना आसरा दिला आहे. वेगवेगळ्या देशांमधील लोकांना सुरक्षित आसरा देणारा आपला देश असल्याचे स्वामी विवेकानंदांनी म्हटले असल्याचेही नायडूंनी सांगितले. विवेकानंदांनीच पाश्चिमात्य जगाला हिंदू धर्माची ओळख करून दिल्याचेही त्यांनी सांगितले.
भारत देश हा संविधान तयार होण्याच्या कितीतरी वर्षांपूर्वीपासूनच 'सर्वधर्म समभाव' विचारसरणीचा आहे. हा सर्व धर्मांचा आदर करतो, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा : नागरिकत्व सुधारणा कायदा भेदभावपूर्ण - शशी थरुर