मुंबई - आजकाल समाज माध्यमे अर्थात् सोशल मीडिया हे लोकांसाठी संवाद साधण्याचे महत्त्वाचे साधन बनले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअॅपस आणि इतर अनेक नेटवर्किंग, फोटो शेअरिंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळे आणि अॅप्लिकेशन्स आपल्या दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाली आहेत.
या संकेतस्थळांवरून आपण अनेक प्रेक्षकांसाठी जलद गतीने ग्राफिक्स, फोटो, संदेश निर्माण करणे, व्यवस्थापन करणे आणि शेअर करण्याची संधी उपलब्ध करुन देतात. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, सोशल मीडियावरून माहितीची निर्मिती आणि शेअरिंगबरोबरच ऑनलाईन जग विस्तारण्याची, लोकांमधील संवाद वाढविण्याची तसेच समवयस्कांना मानसिक आधार देण्याची संधी मिळते. सध्या सुरू असलेल्या कोविड-19 सारख्या सार्वजनिक आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीत, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया महत्त्वाचे साधन ठरू शकते. सोशल मीडिया वापरण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे.
सोशल मीडियावर सकारात्मक, प्रमाणित माहितीचा प्रसार शक्य आहे, त्याचप्रमाणे अफवा आणि चुकीची माहिती पसरविणेदेखील सहजपणे शक्य आहे. यामुळे, सोशल मीडियाच्या माध्यमातून नवी माहिती निर्माण करणे, त्याचप्रमाणे आपल्यापर्यंत पोहोचणारी माहिती शेअर किंवा लाईक करताना आपण सतर्क राहणे आवश्यक आहे. गेल्या काही आठवड्यांत आलेल्या चढ-उतारांमुळे सोशल मीडियाचे दुतोंडी स्वरुप खरोखर समोर आणले आहे.
चांगल्या माहितीमध्ये अशा स्वरुपाच्या संदेश, फोटो, व्हिडिओ आणि ग्राफिक्सचा समावेश होतो ज्याचा उपयोग हात धुणे, शारिरीक अंतर राखणे किंवा स्वतःचे विलगीकरण करणे यासारखे संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभिनव पद्धतीने करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, जागतिक आरोग्य संघटना, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि काही सामाजिक संस्थांद्वारे कशाप्रकारे 20 सेकंद हात धुवावेत (हॅपी बर्थडे गाण्याचा वापर करुन) किंवा शारिरीक अंतर कसे राखावे हे लोकांना दाखवण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर प्रभावीपणे केला जात आहे.
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 22 मार्च रोजी लाखो भारतीयांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या वाजविल्या. परंतु त्यांनी ही गोष्ट इतर लाखो लोकांबरोबर सोशल मिडीयावरुन शेअर केली. घरापासून लांब असणाऱ्या अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांना इतर भारतीयांकडून होत असलेले कौतुक आणि मिळत असलेला पाठिंबा पाहायला मिळाला. आरोग्य कर्मचारी आणि अडकलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी अन्न आणि जीवनावश्यक वस्तू गोळा करीत (क्राउडसोर्सिंग) सामुहिक कृतीचे साधन म्हणून लोकांकडून सोशल मिडीयाचा वापर केला जात आहे.
सेलिब्रिटीज् भारतातील लॉकडाऊनचे पालन करण्याबाबतचे व्हिडिओज आणि संदेश शेअर करीत आहेत. शास्त्रज्ञ, पत्रकार आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील व्यावसायिक सरकारी धोरणे, ताज्या बातम्यांबाबत चर्चा करीत आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या सहकाऱ्यांना सामाजिक आणि भावनिक आधार देत आहेत. वृत्त वाहिन्यांनादेखील सोशल अॅप्सद्वारे आपला प्रसार वाढविण्यास मदत होते आणि नव्या प्रेक्षकांकडून अतिरिक्त मत-मतांतरे उपलब्ध होतात.
दोन जोडप्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, अशा प्रकारची बनावट बातमी पसरविणाऱ्या दोघांना वेगवेगळ्या प्रसंगी मुंबई आणि कोल्हापूर येथे अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे, सोशल मिडीयावर कोविडसंदर्भातील चुकीची माहिती पसरविणाऱ्या 29 वर्षीय महिलेला कोलकाता येथे अटक झाली. काही स्वयंघोषित गुरुंकडून गोमुत्राचे सेवन केल्याने सर्व विषाणूंपासून सुटका होईल, अशा आशयाचे व्हिडिओ प्रसिद्ध केले जात आहेत.
अफवा आणि चुकीची माहिती चार प्रकारची असू शकते -
- लोकांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली अपुरी आणि चुकीची माहिती कारण त्यांच्यादृष्टीने ती माहिती उपयुक्त असते. अशा प्रकारची माहिती ही त्या लोकांच्या भीतीवर आधारलेली असते आणि त्याला पुरावा नसतो.
- लोकांकडून आपल्या समजुतींवर आधारित पसरविण्यात आलेली हानिकारक माहिती
- लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी जाणूनबुजुन पसरविण्यात आलेली चुकीची माहिती
- सातत्याने बदलणाऱ्या परिस्थितीत जुनी झालेली किंवा चुकीची माहिती
चुकीच्या माहितीला बळी न पडता यशस्वीपणे सोशल मिडीयाचे क्षेत्र वापरण्याचे काही मार्ग. जेव्हा एखादी पोस्ट फेसबुक किंवा ट्विटरवर तुमच्या नजरेस पडते किंवा व्हॉटसअॅपवरुन एखादा संदेश तुम्हाला पाठविण्यात (फॉरवर्ड) आला आहे तेव्हा पुढील गोष्टी तपासा -
- स्त्रोतः ही माहिती विश्वासार्ह आहे की एखाद्या अज्ञात स्त्रोताकडून आली आहे हे जाणून घेण्यासाठी कायम माहितीचा स्त्रोत तपासा. माहितीचा लेखक त्या विषयातील अधिकारी आहे का हे तपासा. रेडिओ, दूरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रांसारख्या इतर विश्वासार्ह स्त्रोतांकडून ती माहिती पुन्हा तपासून घ्या. तरीही तुम्हाला खात्री वाटत नसेल तर तज्ज्ञांना विचारणे सर्वोत्तम- तुम्ही सोशल अॅप्सद्वारेही करु शकता.
- मजकुराची गुणवत्ता..
बातमीमधील मजकूराला तथ्याचा आधार आहे की मतांचा हे तपासणे महत्त्वाचे आहे. याशिवाय, काही व्याकरण किंवा शुद्धलेखनाच्या चुकांसह मजकूर अयोग्य रीतीने मांडण्यात आला आहे का हे तपासा- यावरुन असे दिसून येते की त्यात पुरेसा विचार नाही. मजकुरामध्ये कोणत्याही प्रकारच्या तपशीलाचा अभाव असून सनसनाटी दावे करण्यात आले आहेत किंवा संबंधित व्यक्ती, वेळ आणि घटनेचे ठिकाणे याबद्दल अर्धवट तपशील आहेत. संदेश पाठविणाऱ्याच्या आवाजाची पट्टी ही बहुतांशरित्या खात्री पटवून देणारी आणि भावनाप्रधान असते, यामध्ये संतुलित विश्लेषणापेक्षा मजबूत भावनांवर अधिक जोर देण्यात आलेला असतो.
- संदर्भ महत्त्वाचा..
बनावट बातम्यांमध्ये सहसा सत्यापित करता येण्यासारखे पुरावे, प्रतिष्ठित संकेतस्थळे किंवा संबंधित माहितीचा स्त्रोत किंवा पुरावा देण्यात आलेला नसतो. अशावेळी सर्वात चांगला नियम म्हणजे, असामान्य दाव्यांसाठी असामान्य पुरावे आवश्यक आहेत. यामुळे माहितीचे बाहेरील किंवा सत्यापित येण्यासारख्या स्त्रोतांचा संदर्भ तपासण्यास मदत होते, विशेषतः तथ्य आणि आकडेवारी. जर लेखामध्ये मूळ संशोधन सादर करण्यात आले असेल, तर दावे आणि माहितीस इतर क्षेत्रातील तज्ज्ञांची मान्यता आहे का किंवा एखाद्या प्रसिद्धपुर्व किंवा प्रकाशित न झालेल्या पेपरमधून ते घेण्यात आले आहेत हे तपासून पाहा.
गुगलवरील रिव्हर्स इमेज सर्च या वैशिष्ट्याद्वारे तुम्हाला कळेल की कोणताही फोटो खरा आहे की बनावट. यासाठी तुम्हाला गुगल इमेज सर्च संकेतस्थळावर जाऊन तो फोटो अपलोड करावा लागेल. त्यानंतर इतर कोणकोणत्या वेब पेजवर हा फोटो वापरण्यात आला आहे, याची माहिती तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे, त्या फोटोचा संदर्भ योग्य आहे की नाही हेही लक्षात येईल.
- मूल्यमापन करा..
वर नमूद केलेल्या युक्त्या आणि तुम्ही गोळा सर्व माहितीच्या आधारे, एखादा विशिष्ट लेख, ईमेल, फोटो किंवा व्हिडिओ विश्वसनीय किंवा संशयास्पद आहे की नाही याचे मुल्यमापन तुम्ही करु शकता. कोणतीही गोष्ट शेअर करण्यापुर्वी विचार करा आणि संदेश पाठविणाऱ्याला त्याने पाठवलेली बातमी चुकीची आहे हे कळवा.
लेखिका श्रीविद्या मुकपालकर या कम्युनिटी आय हेल्थ जर्नल, साउथ एशियाच्या संपादक आहेत.