नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून दिल्लीमध्ये उसळलेला हिंसाचार निवळल्यानंतर गृहमंत्रालायने एस. एन श्रीवास्तव यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नेमणूक केली आहे. सध्याचे आयुक्त अमुल्य पटनाईक यांच्या जागी एस. एन श्रीवास्तव यांची नेमणूक करण्यात आली आहे. २९ फेब्रुवारी रोजी पटनाईक यांची मुदत संपत आहे.
दिल्लीच्या गृह मंत्रालयाने या संबंधिची नोटीस जारी केली आहे. एस. एन श्रीवास्तव सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात विशेष पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची नियुक्ती आयुक्तपदी करण्यात आली आहे. श्रीवास्तव १८८५ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी बी. टेक आणि एएबीचे शिक्षण घेतले आहे.
दिल्ली हिंसाचाराचा तपास विषेश तपास पथकाकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या जाळपोळ, हिंसाचाराचा तपास पथकाकडून करण्यात येत आहे. आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २०० पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. या प्रकरणी ५०० नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर ४८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने हिंसाचाराप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सरकारला ४ आठवड्यांची मुदत दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर आणि फराह नक्वी यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. द्वेष पसरवणारे भाष दिल्याप्रकरणी भाजप नेते कपील मिश्रा, अनुराग ठाकूर, परवेश सिंग आणि अभय वर्मा यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.