नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवरील संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन्ही देशातील अधिकारी व सैन्यात सतत बैठका होत आहेत. यामुळे दोन्ही देशातील मतभेद लवकरच सोडवण्यात यश येतील. दोन्ही देशांदरम्यान मेजर जनरल पातळीवरील चर्चा सुरू असून आपण संवादाद्वारे (भारत आणि चीन) सर्व कथित मतभेद दूर करू, असे आज लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी सांगितले.
नेपाळशी आपले खूप मजबूत नाते आहे. आपल्याकडे भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक दुवे आहेत. दोन्ही देशाचे हितसंबंध दृढपणे एकमेकांशी जोडलेले आहेत. हे संबंध नेहमीच दृढ राहिले आहेत आणि ते कायमच मजबूत राहतील, असेही लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे म्हणाले.
दरम्यान, भारत आणि आणि चीनचे सैनिक पाच मेपासून पूर्व लडाखमधील सीमारेषेवर आमनेसामने उभे ठाकले होते. त्यामुळे भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावर दोन्ही देशांनी सीमेवर स्थिती सामान्य करण्यासाठी पावले उचलली आहेत.