नवी दिल्ली - संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी पुढील दोन दिवसांचे पूर्वनियोजित कार्यक्र रद्द केले आहेत. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर त्यांनी हा निर्णय घेतला. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या अंत्यविधीसाठी त्या तामिळनाडू आणि कर्नाटकात उपस्थित राहणार आहेत.
दहशतवादी हल्ल्यात विरमरण आलेल्या जवानांना सीतारमण यांनी शुक्रवारी श्रद्धांजली वाहिली. जवानांना राष्ट्रध्वजामध्ये लपेटून दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आले होते. केंद्रीय मंत्र्यांनी हुतात्मा जवानांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत. त्याप्रमाणे भाजप शासीत राज्यांत केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार त्यांच्या स्वतःच्या भागात अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, निर्मला सीतारमण, राज्यवर्धन राठौर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सर्व दलांच्या प्रमुखांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. या दहशतवादी हल्ल्यात ४५ सीआरपीएफ जवानांना वीरमरण आले आहे.