दिल्ली - कोलकाता येथे अमित शाह यांची मंगळवारी रॅली झाली होती. या रॅलीत झालेल्या हिंसाचारात ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशीसाठी कोलकाता पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे.
ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडल्याची चौकशी करण्याची मागणी बंगाल तसेच देशभरातून करण्यात येत होती. तृणमुल काँग्रेस आणि भाजप हे पुतळा तोडल्याप्रकरणी एकमेकांवर आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची चौकशी एसआयटी (Special Investigation Team) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांनी केली होती. तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार घडवून ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडला. तिथे सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले होते. ज्याप्रमाणे शारदा चिटफंड प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यात आले त्याचप्रणाणे कोलकातामधील घटनांचे देखिल पुरावे बंगालच्या सरकारने नष्ट केल्याचा आरोपही त्यांनी केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांच्यावर टीका केली होती. अमित शाह यांच्या रॅलीत ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडला. मात्र, मोदी यांनी याबाबत खेद व्यक्त केला नसल्याचे ममता म्हणाल्या होत्या.
ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडल्यामुळे दु:खी झाल्याचे मत पश्चिम बंगालचे राज्यपाल के. एन. त्रिपाठी व्यक्त केले होते. ज्यांनी पुतळा तोडला त्यांची ओळख पटवून त्यांना पकडण्यात यावे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. विद्यासागर यांचा नवा पुतळा पुन्हा बसवण्यासाठी कलकत्ता विद्यापीठाने कार्यवाही करावी, अशी मागणी त्रिपाठी यांनी केली होती.