नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना संकटामुळे 21 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण देश थांबला आहे. व्यापार, उद्योगधंदे, वाहतूक आणि दळवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे प्रदॉूषण विरहीत स्वच्छ आकाश सगळीकडे पाहायला मिळत आहे.
दररोज लाखो वाहने रस्त्यांवरून धावत असतात. मात्र, संचारबदीमुळे तुरळक वाहने रस्त्यावर आहेत. तसेच उद्योगधंदे बंद असल्यामुळे प्रदूषण खालावले आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये कमालीचे प्रदुषण कमी झाले आहे.
21 दिवसांच्या संचारबंदीमुळे पुढील काही दिवसांत प्रदुषण आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सध्याची हवामानाची स्थिती मानवाचा हस्तक्षेप आणि प्रदुषणातील सहसंबध दर्शवत आहे, असे हवामान खात्याच्या प्रादेशिक विभागचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले.
वाहनांची गर्दी कमी असल्याने आणि उद्योगधंदे बंद असल्याने प्रदुषण कमी झाले आहे. तसेच पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडत आहे. उष्ण वायू आणि धुलिकण मोठ्या शहरी भागांमध्ये कमी झाले आहेत. भारताची आर्थिक राजधानी मुंबईत हवा सामान्य स्तरावर आली असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले.
श्वसनास त्रास करणारे धुलिकण कमी झाल्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रासही कमी होत आहे. याबरोबरच चीन आणि इटलीमध्ये संचारबंदीच्या काळात नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आल्याचे जागतिक हवामान खात्याने(WMO) सांगितले.