नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री दिवंगत दिग्विजय सिंह यांची मुलगी नेमबाज श्रेयासी सिंह यांनी आज रविवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप नेते भुपेंद्र यादव यांची यावेळी प्रमूख उपस्थिती होती. तसेच अरुण सिंह आणि भाजपचे बिहार राज्य प्रभारी संजय जयस्वाल हेही यावेळी उपस्थित होते. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांना बिहारमधून भाजपचे आमदरकीच्या उमेदवारीचे तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे.
यावेळी श्रेयासी म्हणाल्या, की दिवंगत वडील दिग्विजय सिंह यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांना बिहार विधानसभा निवडणुकीत बांका जिल्ह्यातील अमरपूर किवा जमुई येथील उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे. ही उमेदवारी भाजप आणि मित्रपक्षातील जागा वाटपावर अवलंबून आहे. सद्या जमुई या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व एलजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान करत आहेत.
पुढे त्या म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील ६ वर्षातील कामावरुन प्रभावित झाले आहे. तसेच त्यांची नुकतीच चालू केलेली आत्मनिर्भर भारत ही योजना तरुणांना रोजगार देणारी व देशाला सशक्त बनविणारी आहे. या निवडणुकीत जद(यु) आणि भाजपची युती होणार असून मला नेहमीच नितीशकुमारांनी बिहारमध्ये केलेल्या कामाचा अभिमान आहे.
श्रेयासींच्या आई पुतुल देवी यांनी २०१४ मध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जिंकली आहे. त्या बांका जिल्ह्याच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. यावेळी त्यांनी ही निवडणूक भाजपच्या चिन्हांवर लढली होती. तसेच २०१९ पर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होत्या. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आणि जनता दल युनायटेडची युती झाली होती. यावेळी बांका जिल्ह्याची जागा जनता दल युनायटेडच्या वाट्याला गेली होती. यामुळे पुतुल देवी आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढली. यामुळे पक्षाने त्यांना ६ वर्षासाठी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला होता.
बिहारच्या २४३ विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीची घोषणा नुकतीच निवडणूक आयोगाने केली आहे. बिहारमध्ये २८ ऑक्टोंबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये ही निवडणुकीचे मतदान होणार आहे.