नागपूर - नेतृत्वहीन झालेल्या काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. आमदार, खासदारांना पक्षावर विश्वास उरला नाही. तर, काँग्रेस विसर्जित करण्याचे महात्मा गांधीचे स्वप्न त्यांचा बनावटी नातू पूर्ण करेल, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
सध्या देशभरात भारतीय जनता पक्षाचे सदस्यता नोंदणी अभियान सुरू आहे. त्यासंबंधी नागपूर भेट देण्यासाठी आलेल्या शिवराजसिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. कर्नाटकनंतर गोवा येथे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. यामागे भारतीय जनता पक्षाचे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जात आहे. या संदर्भात भाजप नेते शिवराजसिंह चौहान म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा. कुमारस्वामींना मुख्यमंत्री राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. कर्नाटकमधील युती वैचारिक मुद्यांवर नव्हती. त्यामुळे युती टिकून राहणे कठीण होते. याची सर्वांनाच कल्पना होती. सर्वांनाच याची कल्पना होती. आम्ही कुठलेही सरकार पाडत नाही. त्यांना संभाळाता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
महात्मा गांधी यांचे काँग्रेस विसर्जित करण्याचे स्वप्न त्यांचे बनावटी नातू पूर्ण करतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आमची नियत खराब असती तर, त्यावेळीच कर्नाटकमध्ये जेडीयुचे सरकार बनू दिले नसते. नेतृत्वहीन झालेल्या काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीकाही शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेसवर केली आहे.