पणजी - युती झाली तर काही ठिकाणी चिन्ह विचारात घेतले जात नाहीत. निवडणूक ही कार्यकर्त्यांला सिध्द करण्याचे व्यासपीठ आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील युतीचा आदर ठेवून शिवसेना लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा लढणार, अशी माहिती शिवसेनेचे गोवा प्रभारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी उमेदवारांची घोषणाही केली आहे.
शिवसेना कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले, गोव्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानुसार उमेदवार आयात न करता पक्ष कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार उत्तर गोव्यातून राज्य प्रमुख जितेश कामत तर दक्षिण गोव्यातून उपाध्यक्ष राखी नाईक प्रभुदेसाई यांना उमेदवारी देण्याचे ठरविण्यात आले आहे.
विधानसभा पोट निवडणुकीच्याही रिंगणात शिवसेना-
तर गोवा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या तीन जागांसाठी त्याचवेळी निवडणूक होत आहे. त्याविषयी बोलताना राऊत म्हणाले, गोव्यात सरकार आहे की नाही? सरकार कोण चालवतत आहे, हेच कळत नाही. सरकारमधील आमदारच सरकार विरोधी भूमिका घेत आहेत. अशा स्थितीत लोकसभा निवडणूक होत आहे. त्याबरोबरच विधानसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यामधील मांद्रे मतदारसंघात शिवसेना उमेदवार उभा करणार आहे. यासाठी उमेदवार ठरविण्यात करण्यात आला आहे. यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोवा सुरक्षा मंच बरोबर युती केली होती. त्यामुळे गोसुमं प्रमुख सुमाष वेलिंगकर यांच्याशी चर्चा करणार आहोत.
गोसुमंने पोटनिवडणुकीसाठी यापूर्वी उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे आता युती शक्य आहे का ? असे विचारले असता, राऊत म्हणाले, आमची विचारधारा एक आहे. परंतु, जर अपेक्षित चर्चा झाली नाही तर आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत.
महाराष्ट्रात भाजपशी युती आहे मग गोव्यात का नाही ? यावर बोलताना राऊत म्हणाले, भाजपला जर गोव्यात युती हवी असेल तर शिवसेनेचे दरवाजे त्यांना खुले आहेत. मात्र, त्यांना गोव्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांशी बोलावे लागेल. यावेळी जितेश कामत, राखी नाईक, सरचिटणीस मिलिंद गावस आणि संपर्क प्रमुख जीवन कामत उपस्थित होते.