नवी दिल्ली - देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला जेएनयू विद्यार्थी शरजील इमाम याची पुढील पाच दिवस पोलीस चौकशी होणार आहे. देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी शेरजीलला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने बिहारमधून अटक केली होती. जामिया मिलिया उस्मानिया विद्यापीठामध्ये केलेल्या प्रक्षोभक भाषणांबाबत त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
देशविरोधी वक्तव्य केल्यामुळे शरजील इमामवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दिल्लीसह उत्तर प्रदेश, आसाम, मणिपूर आणि बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला बिहारमधील जहानाबाद येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर बुधवारी त्याला दिल्लीमध्ये आणून, उच्च संरक्षणात मुख्य महानगर दंडाधिकारी पुरुषोत्तम पाठक यांच्या निवासस्थानी दाखल करण्यात आले होते.
पोलीस उपायुक्त राजेश देव यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमामला पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यादरम्यान आम्ही त्यांची चौकशी करून, त्या आक्षेपार्ह भाषणावेळी त्याच्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच, गरज पडल्यास त्याच्या सहकाऱ्यांचीही चौकशी आम्ही करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील इतिहास विभागाचा विद्यावाचस्पती अभ्यासक असणाऱ्या शेरजीलला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनांमध्ये त्याने केलेली प्रक्षोभक भाषणे सोशल मीडियावर पसरल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात अलीगढ मुस्लीम विद्यापीठात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. आसामला भारतापासून वेगळे करायला पाहिजे, असे तो म्हणाला होता. भारताच्या पूर्वेकडील राज्यांना जोडणारा भाग असलेल्या 'चिकन्स नेक' (चिंचोळा भूप्रदेश) येथे चक्का जाम करुन आसामला भारतापासून वेगळे करायला हवे, असे तो म्हणाला होता. देशद्रोहाच्या आरोपाबरोबरच दंगल घडवल्यासंबधी कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : 'सीएए'वरील युरोपीय महासंघातील मतदान ढकलले पुढे..