कोलकाता - शारदा चिटफंड घोटाळ्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) अधिकाऱ्यांच्या हाती पुन्हा एकदा निराशा आली आहे. सीबीआयने समन्स बजावून कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु, राजीव कुमार यांनी यास नकार देत अजून वेळ मागितली आहे.
रविवारी सीबीआयचे अधिकारी राजीव कुमार यांच्या घरी गेले होते. परंतु, राजीव कुमार घरी नव्हते. त्यामुळे, आज (सोमवार) सीबीआयने समन्स बजावत राजीव कुमार यांना उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु, राजीव कुमार यांनी सॉल्ट लेक येथे असलेल्या सीबीआय कार्यालयात सीआयडी अधिकाऱ्यामार्फत पत्र पाठवत शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणात उपस्थित होण्यासाठी वेळ मागितली आहे. मी ३ दिवस बाहेर आहे. त्यामुळे मी हजर राहण्यास असमर्थ आहे, असे राजीव कुमार यांनी पत्रात लिहिले आहे. याआधीही राजीव कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील करत वेळ मागितली होती. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची मुदत देत सीबीआयसमोर हजर राहण्यास सांगितले होते. राजीव कुमार यांनी न्यायालयाच्या या आदेशाकडेही दुर्लक्ष केले होते. १७ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राजीव कुमार यांना अटकेपासून सुरक्षा देण्यासाठी ५ फेब्रुवारीला काढण्यात आलेला आदेश माघारी घेतला आहे.
काय आहे प्रकरण?
राजीव कुमार शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास समितीचे (एसआयटी) प्रमुख होते. परंतु, काही काळानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. प्रकरणाची चौकशी करत असताना राजीव कुमार यांनी पुरावे नष्ट केले, असा आरोप होत आहे. राजीव कुमार यांना ममता बॅनर्जी यांच्या जवळचे मानले जाते. त्यांच्या विरोधात झालेल्या कारवाईला ममतांनी असंवैधानिक म्हणत धरणे आंदोलनही केले होते. याआधीही शिलाँग येथे राजीव कुमार यांची चौकशी करण्यात आली होती. परंतु, त्यांनी चौकशीत सहकार्य केले नाही, असा आरोप सीबीआयने केला आहे.
शारदा चिट फंड घोटाळा
शारदा चिटफंड घोटाळा २ हजार ५०० कोटींपेक्षा मोठा घोटाळा आहे. पश्चिम बंगालमध्ये शारदा ग्रुप ऑफ कंपनीकडून गुंतवणूकदारांना मोठ्या व्याजाचे अमिष दाखवून पैसे गोळा केले होते. परंतु, कंपनीने लोकांना अद्याप पैसे दिलेले नाहीत.