दिल्ली - शांतिकुंजच्या प्रमुखांविरुद्ध एका महिलेने एफआयआर दाखल केला आहे. शांतीकुंज आश्रमात हरिद्वारमध्ये या महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात पीडितेने सांगितले की, 2010 मध्ये जेव्हा ती 14 वर्षांची होती, तेव्हा 19 मार्च 2010 ला गावातील एका व्यक्तीबरोबर हरिद्वारला पोहोचली. जिथे शांतिकुंज गायत्री कुटुंबात तिला अन्न आणि प्रसाद बनवण्यासाठी कामावर घेण्यात आले.
जुलै 2010 रोजी शांतीकुंजच्या प्रमुखाला कॉफी देण्यासाठी खोलीत गेली होती. त्यावेळी खोलीचा दरवाजा बंद करण्यात आला. त्यानंतर खोलीत तिच्यावर बलात्कार केल्याचा पीडितेचा आरोप आहे. पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या आठवड्यानंतर तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्यात आला आणि याबद्दल कोणाला काहीही सांगू नको, अशी धमकी दिली. परंतु, पीडितेने धैर्याने घटनेची माहिती दिली असता, तिला शांत राहण्यास सांगण्यात आले.
घटनेनंतर पीडितेची प्रकृती खालावू लागली. उपचारानंतरही काही सुधारणा न झाल्याने तिला 2014 मध्ये घरी परत पाठवण्यात आले. तब्येत सुधारल्यानंतर तिला पुन्हा हरिद्वार येथे बोलावण्यात आले. पण, तिने येण्यास नकार दिला. पीडितेने 2018 मध्ये पुन्हा या घटनेबद्दल तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पण, शांतीकुंज प्रमुखांना मुलीला तुझ्या तक्रारीने काहीही होणार नाही, अशी फोनवर धमकी दिली.
जेव्हा निर्भयाच्या दोषींना शिक्षा झाली तेव्हा पीडितेला प्रोत्साहन मिळाले आणि कायद्याबद्दल आत्मविश्वास वाढला. त्यानंतर तिने 7 एप्रिलला पीएमओ आणि राष्ट्रीय महिला आयोगाला ईमेलद्वारे घटनेची माहिती दिली. दरम्यान, मुलगी लॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकल्यामुळे शून्य एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे शांतिकुंज प्रमुखांनी संपूर्ण प्रकरण फेटाळले असून, स्वत: च्या संस्थेत राहून त्यांच्याविरूद्ध कट रचल्याचे सांगितले आहे. महिलेकडून आरोप करून गेल्या 10 वर्षांपासून त्याच्याकडे पैशांची मागणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.