भोपाळ - हिंदूंचे आद्य शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. चामड्याचा पट्टा आणि बूट परिधान करणारे आंबेडकर हे श्रीराम आणि विवेकानंदांची बरोबरी कशी काय करू शकतील? असा प्रश्न त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. ते भोपाळमध्ये बोलत होते.
इलाहाबादमध्ये मागे आरएसएसचे एक संमेलन झाले. त्यामध्ये स्वामी विवेकानंद, आंबेडकर आणि श्रीराम अशा तीन महापुरुषांचे पुतळे एकत्र उभे केले होते. श्रीरामांच्या शेजारून लक्ष्मण आणि सीतेला हटवून त्याजागी या दोन महापुरुषांचे पुतळे होते. या तिन्ही महापुरुषांचे कर्तृत्व नक्कीच मोठे आहे. आम्ही असे नाही म्हणत, की आंबेडकर रामाजवळ नाही जाऊ शकत. मात्र, चामड्याचा पट्टा आणि बूट घातलेले आंबेडकर हे, इतर दोन महापुरुषांची बरोबरीही करू शकणार नाहीत, असे स्वरूपानंद म्हटले.
जर प्रस्तावित राममंदिरात रामासोबत सीता आणि लक्ष्मणाऐवजी आंबेडकर आणि विवेकानंदांच्या मूर्ती उभ्या केल्या, तर ते तुम्हाला पटेल का? त्यामुळेच आम्ही असे आवाहन करतो, की राममंदिराच्या निर्माणासाठी आरएसएस किंवा तत्सम संस्थांना परवानगी न देता, केवळ आम्हाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणीदेखील स्वरूपानंद यांनी केली.