भोपाळ - भाजपच्या अनेक वाचाळ नेत्यांपैकी एक असलेले खासदार गिरीराज सिंह यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्यावर टीका केली आहे. शबाना ह्या तुकडे- तुकडे आणि पुरस्कार परत करणाऱ्या संघटनेच्या प्रमुख आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
शबाना आझमी यांनी एका कार्यक्रमादरम्यान भाजपवर निशाणा साधला होता. 'आज परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. जी व्यक्ती सरकारविरोधात बोलेल त्या व्यक्तीला देशविरोधी ठरवलं जातयं', असे त्या म्हणाल्या आहेत. इंदोर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यामुळे शबाना यांच्यावर गिरीराज सिंह यांनी टि्वटच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे.
गिरिराज सिंह यांनी यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे इफ्तार पार्टीतील छायाचित्र ट्विट करीत त्यावर वादग्रस्त कमेंट केली होती. त्यावेळी अमित शाह यांनी त्यांना फोन करुन खडसावले होते. वादग्रस्त विधाने करणे टाळावीत, असा सल्ला शाह यांनी त्यांना दिला होता.