नवी दिल्ली - भारत सरकारने टिक टॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम '६९-अ'मध्ये दिलेल्या तरतुदींचा वापर करुन सरकारने हा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेला तसेच सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणारी ही अॅप्स आहेत. त्यामुळे, या अॅप्सना देशात बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अजूनही असे अनेक अॅप आहेत, ज्यावर सरकारने कोणतीही बंदी आणलेली नाही.
पबजी, एमव्ही मास्टर, एली एक्सप्रेस, टर्बो व्हीपीएन, अॅपलॉक बाय डू मोबाईल, रोझ बझ वी मीडिया, ३६० सिक्युरीटी, अॅप लॉक्स, नोनो लाईव्ह, गेम ऑफ सुल्तान्स, माफिया सिटी आणि बॅटल ऑफ एम्पायर्स हे अॅप प्ले स्टोरवर असून यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. दरम्यान, या अॅपवर बंदी न आणण्यामागे विविध कारणे असू शकतात.
पबजीवर बंदी न आणण्यामागे काय कारणे असू शकतात -
पबजी अॅपपासून असलेल्या धोक्यांबद्दल सुरक्षा एजन्सीजने पडताळणी केली असावी. तसेच पबजी हे अॅप पूर्णपणे चायनीज नाही, हे देखील एक कारण असू शकते. पबजी गेम ब्लू होल या कंपनीने तयार केला असून ती दक्षिण कोरीयाची कंपनी आहे. पबजी लोकप्रिय झाल्यानंतर टेन्सेंट या चायनीज कंपनीने ब्लू होल कंपनीसोबत हातमिळवणी केली. हा गेम भारतात टेन्संट कंपनीच्या नावाखाली लाँच करण्यात आला. मात्र, हा गेम चायनीज नाही, असे म्हणता येणार नाही. या अॅपची मालकी दोन देशांकडे असल्याने त्यावर बंदी आणायची की नाही याबाबत सरकार संभ्रमात असू शकते.
फोनमध्ये आधीच असलेल्या चायनीज अॅपचे काय होणार?
सरकारने गूगल आणि अॅपलला हे ५९ अॅप बंद करण्याचे ऑर्डर दिल्यानंतर हे अॅप प्ले स्टोर आणि आयओएस स्टोरवरून हटविण्यात येतील. हे अॅप ब्लॉक करण्यासाठी सरकारने इंडीयन इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स आणि टेलिकॉम प्रोव्हायडर्सशी चर्चा केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे अॅप आपोआपच काम करणे बंद करतील.
ज्यांच्याकडे शाओमीचे फोन आहेत त्यांचे काय होणार -
सरकारने एमआय म्हणजेच शाओमीच्या आधीच इंस्टॉल असलेल्या एमआय कम्युनिटी आणि एमआय व्हिडिओ कॉल हे अॅप बंद केले आहेत. ज्यांच्याकडे एमआयचे फोन आहेत, त्या फोनच्या सर्व्हिसेस सुरू राहतील.
गेल्या काही वर्षात अॅप मार्केटमध्ये चायनीज अॅपचे प्रमाण खूप वाढले होते. २०१७ मध्ये मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याच्या बाबतीत टॉप १०० अॅप्समध्ये केवळ १८ चायनीज अॅप होते. मात्र, २०१८ वर्षात १०० पैकी ४४ अॅप चायनीज होते.
'या' ५९ अॅपवर घालण्यात आलीए बंदी -
या अॅप्सवर घालण्यात आली बंदी -टिक-टॉक, शेअर-इट, क्वाई, यूसी ब्राऊजर, बायडू मॅप, शेईन, क्लॅश ऑफ किंग्स, डीयू बॅटरी सेव्हर, हेलो, लाईकी, यूकॅम मेकअप, एमआय कम्युनिटी, सीएम ब्राऊजर, व्हायरस क्लिनर, एपीयूएस ब्राऊजर, रोमवुई, क्लब फॅक्टरी, न्यूजडॉग, ब्यूट्रीप्लस, वुईचॅट, यूसी न्यूज, क्यूक्यू मेल, वेईबो, झेन्डर, क्यूक्यू म्युूझिक, क्यूक्यू न्यूजफीड, बिंगो लाईव्ह, सेल्फिसिटी, मेलमास्टर, पॅरलल स्पेस, एमआय व्हिडिओ कॉल, वुईसिंक, ईएस फाईल एक्सप्लोरर, व्हिवा व्हिडिओ, मेईटू, व्हिगो व्हिडिओ, न्यू व्हिडिओ स्टेटस, डीयू रेकॉर्डर, व्हॉल्ट - हाईड, कॅशे क्लीनर, डीयू क्लीनर, डीयू ब्राऊजर, हागो, कॅम स्कॅनर, क्लीन मास्टर, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेयर, वुई मीट, स्वीट सेल्फी, बाईडू ट्रान्सलेट, व्ही-मेट, क्यूक्यू इंटरनॅशनल, क्यूक्यू सिक्युरिटी सेंटर, क्यूक्यू लॉंचर, यू व्हिडिओ, व्ही फ्लाय स्टेटस व्हिडिओ, मोबाईल लेजंड्स, डीयू प्रायव्हसी.