जयपूर - राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका 30 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. निरंजन कुमार असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर सात वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे.
ही मुलगी तिच्या घराच्या व्हरांड्यात झोपली होती. तेथून आरोपीने तिला बुधवारी रात्री पळवून नेले. मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याने तिला निर्जन जागी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
या तक्रारीच्या आधारे आरोपींविरुध्द आयपीसी आणि पॉक्सो (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याला अटक करण्यात आल्याची माहिती अलवर पोलीस अधीक्षक अनिल पारिस देशमुख यांनी दिली. मुलीच्या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.