कांकेर (छत्तीसगड) - जिल्ह्यातील माओवादी प्रभावित सिकसोड पोलीस ठाणे क्षेत्रात पोलिसांच्या शोध पथकाने माओवाद्यांनी लपवून ठेवलेले आयईडी बॉम्बसह अन्य साहित्य हस्तगत केले. यात वायर्स, काही औषधे यांचाही समावेश आहे.
अंतागढचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDOP - एसडीओपी) कौशलेंद्र पटेल यांनी माओवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेले आयईडी सापडल्याचे सांगितले. या भागात आणखी शोध मोहीम राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘माओवादी एखाद्या मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते, असे त्या तयारीवरून दिसत होते. मात्र, जवानांच्या पथकाने त्यांचे मनसुबे उधळून लावले,’ असे पटले म्हणाले. जवान अजूनही माओवाद्यांच्या कारवायांवर नजर ठेवून आहेत आणि शोध मोहीम चालूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बिथरलेले माओवादी रचताहेत कारस्थान
जिल्ह्यातील माओवाद्यांचे शहरी नेटवर्क पोलिसांच्या पथकाने उद्ध्वस्त केले. यामुळे माओवादी बिथरले आहेत. दोन दिवसांपूर्वी रावस परिसरात माओवादी आणि पोलिसांदरम्यान धुमश्चक्री झाली होती. यात जवानांनी जोरदार हल्ला चढवल्यामुळे माओवाद्यांना पळ काढावा लागला. या घटनेत जीवितहानी झाली नव्हती. मात्र, जंगलातून आयईडी बॉम्ब हस्तगत केले होते.