रायपूर - छत्तीसगडमधील सुरक्षा दलाच्या जवानांना मोठी कामगिरी पार पाडली आहे. मंगळवारी सकाळी डब्बाकोंटा भागात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जवानांनी ८ लाख रुपये बक्षिस असलेल्या महिला नक्षलवादीला ठार केले आहे. जवानांनी महिला नक्षलवाद्याकडून इंसास रायफल जप्त केली आहे. ही रायफल ताडमेटला येथे वीरमरण आलेल्या जवानाची होती.
सुकमा पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी सांगितले, डब्बाकोंटा भागामध्ये नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे सोमवार-मंगळवार रात्री डीआरजी आणि एसटीएफ यांचे संयुक्त पथक घटनास्थळाकडे निघाले. १५ किलोमीटर पायी चालत गेल्यानंतर जवान नक्षलवाद्यांच्या ठिकाणी पोहचले. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या गोळीबारामध्ये जवान वरचढ दिसताच नक्षलवादी पळून गेले. गोळीबारात महिला नक्षलवादी ठार झाली आहे. महिला नक्षलवादीच्या ओळख पटवण्यात आली आहे. महिला नक्षलवादी कमांडर म्हणून काम पाहत होती. तर, इतरही नक्षलवादी गोळीबारात जखमी झाले आहेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ताडमटेला येथे नक्षलवाद्यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ७६ जवान हुतात्मा झाले होते. हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी जवानांकडील हत्यारे लुटली होती. यामधील एक रायफल महिला नक्षलवाद्याकडून जप्त करण्यात आली आहे.