श्रीनगर - काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात एका मुख्य रस्त्यावर पेरुन ठेवलेला भूसुरुंग सुरक्षा दलांनी निकामी केला आहे. यामुळे मोठी हानी टळली. पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी दुसरा प्रयत्न केला आहे.
राजौरीतील एका मुख्य रस्त्यावर भूसुरूंग पेरून ठेवल्याची माहीती राजौरी जिल्हा पोलिसांना मिळाली होती. सुरक्षा दलांनी वेळीच सतर्क होत हा सुरूंग निकामी केला. राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने काल (दि. २६ मे) गोळीबार केला होता. यामध्ये मुहम्मद इशाक नावाचा एक नागरिक जखमी झाला होता. २४ मे रोजी दहशतवाद्यासोबत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी कुख्यात दहशतवादी जाकिर मुसा याला कंठस्नान घातले होते. त्यामुळे काश्मिर खोऱ्यात तणावाचे वातावरण होते. त्यामुळेच हा घातपाताचा प्रयत्न झाल्याचे बोलेले जात आहे.