नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये कोरोना बाधीत रुग्णाची संख्या 83 वर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगत बिहार राज्यातील शिवहर जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू करण्यात आहे.
कोरोना विषाणूचा पहिला बळीही कर्नाटकात गेला आहे तर दिल्लीमध्ये एका ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. भारतातील हा कोरोनाचा दुसरा बळी आहे. तसेच अनेक जणांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारने कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता सर्व राज्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. या नंबरवरुन नागरिकांना कोणत्याही मदतीसाठी फोन करता येणार आहे. ०११ - २३९७८०४६ हा क्रमांक केंद्र सरकारने जारी केला आहे.
कोरोना विषाणूचा प्रभाव अनेक क्षेत्रावर पडला आहे. लष्कराने सर्व लष्करभरती एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, लष्कराने आपल्या जवानांना केवळ अत्यावश्यक कामासाठीच प्रवास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोरोनामुळे गेल्या दोन दिवसात शेअर बाजारात प्रचंड घसरण झालेली आहे. याचाच परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. सोन्याचे दर एकाच दिवसात तब्बल दीड हजार रुपयांनी खाली आले आहेत.