श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या शोपियां येथील राष्ट्रीय रायफल्सच्या तळावर दहशतवाद्यांच्या संशयास्पद घडामोडी समोर आल्या आहेत. त्यानंतर सैनिकांनी त्वरित कारवाई करून तपास सुरू केला आहे. तर, या घटनेनंतर संपूर्ण परिसरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारी सांयकाळी शोपियां येथील नबगल येथे काही दहशतवादी दिसल्याची सैनिकांना सूचना मिळाली होती. आधिपासूनच सक्रिय असलेल्या जवानांनी परिस्थितीची कल्पना येताच परिसराला वेढा दिला. त्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये तपास सुरू केला आहे. शुक्रवारीच भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याला पाकिस्तानने मुक्त केले. मात्र, या घटनेच्या २४ तासांच्या पूर्वीच दहशतवाद्यांनी हे कृत्य केले आहे.
मागील काही दिवसांपासून पाकिस्तानचे सैन्य शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. तर, सीमेपलिकडून काही दहशतवादी भारतात शिरले असल्याची गुप्त माहिती सैनिकांना मिळाली आहे. अधिकृतपणे या सूचनेची वैधता सैनिकांनी दिलेली नाही. मात्र, दहशतवादी भारतात शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी गुप्त सुत्रांकडून सैनिकांना माहिती मिळाली होती.
सकाळी नियंत्रण रेषेच्या जवळ असलेल्या जमोला, बथूनी, ढांगरी इत्यादी ठिकाणी काही लोक संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आले होते. त्यानंतर पोलीस आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केले होते. या पथकाने संपूर्ण जंगल पालथे घातले होते. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते.