नवी दिल्ली - भारतीय वायुसेनेचे बेपत्ता झालेल्या आयएएफ एएन-३२ विमानाची शोधमोहीम रविवारी खराब हवामान असल्यामुळे स्थगित करण्यात आली. त्यामुळे सोमवारपासून बेपत्ता असलेल्या विमानाचा ७ दिवस उलटले असूनही अद्याप शोध लागलेला नाही.
आज रविवारी एएन-३२ च्या शोधासाठी सी-१४०जे विमाने आणि हेलिकॉप्टर्सनी उड्डाण केले होते. खराब हवामानामुळे आणि अंधुक प्रकाशामुळे त्यांना माघारी परतावे लागले. परंतु, जमिनीवरुन विमानाचा शोध सुरू असल्याची माहिती भारतीय वायुसेनेच्या प्रवक्त्याने दिली आहे.
काल शनिवारी भारतीय वायुसेनेने बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्याला ५ लाखाचे बक्षिस जाहीर केले होते. स्वत: एअर चीफ मार्शल बीएस धनोआ यांनी शोधमोहीमाचा आढावा घेण्यासाठी काल जोरहाट येथे भेट दिली होती. यावेळी त्यांनी शोधाची शक्य तेवढी पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले होते.
बेपत्ता विमानाचा हेलिकॉप्टर्सद्वारे रात्रंदिवस शोध घेण्यात येत आहे. रात्री लेझर यंत्रणेद्वारे शोध घेण्यात आहे. परंतु, अजूनही विमानाचे अवशेष सापडले नाहीत. याबरोबरच नौदलाचे पी-८१ आणि ग्लोबल सर्विलेंस विमाने एनटीआरओ उपग्रहाद्वारे शोध सुरू आहे. सोबत पहिल्या दिवसापासूनच सुखोई आणि सी-१३० जे विमाने आणि काही पथके प्रत्यक्ष जमिनीवरुन शोध घेत आहेत.
आसाममधील जोरहात विमानतळावरून उड्डाण केलेले आएएफ एएन-३२ हे विमान ३ जूनला १२ वाजून २५ मिनिटांनी बेपत्ता झाले होते. या विमानात वायुसेनेचे १३ कर्मचारी आहेत. अरुणाचल प्रदेशातील मेनचुका हवाईक्षेत्रात हे विमान बेपत्ता झाले आहे.