नवी दिल्ली - निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी मुकेश कुमार याने फाशी टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. या याचिकेत मुकेशने स्वतःच्याच जुन्या वकिलांवर आपली दिशाभूल केल्याचा आरोप केला होता.
निर्भयाचा गुन्हेगार मुकेश कुमारने सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल करत आपल्याला सर्व कायदेशीर उपायांचा वापर करण्याची मुभा मागितली होती. या याचिकेत मुकेश याने स्वतःच्याच जुन्या वकिलांवर आपली दिशाभूल केल्याचा आरोप केला होता. क्यूरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी दिला जातो, या बाबीची माहिती व्रिंदा ग्रोवरने आपल्याला दिली नसल्याचे त्याने म्हटले होते. अशा स्थितीत आपल्याला क्यूरेटिव्ह पिटीशन आणि अन्य कायदेशीर मार्गांचा वापर करू दिला जावा, असे मुकेश कुमार याने म्हटले होते. यावेळी मुकेश आपले नवे वकील एम. एल. शर्मा यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
दरम्यान, निर्भया प्रकरणी पवन गुप्ता, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह आणि मुकेश कुमार या चौघांना २० मार्चला पहाटे ५.३० वाजता फाशी होणार आहे. डिसेंबर 2012 मध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने यापूर्वी 11 मार्च 2013 मध्ये तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.