नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीएसईच्या परीक्षा रद्द करण्यास परवानगी दिली आहे. सीबीएसईच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा जुलै महिन्यात होणार होत्या. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मंडळाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेकडून विद्यार्थ्यांच्या टक्क्यांची सरासरी काढून रद्द झालेल्या विषयांच्या परीक्षेचे गुण देण्यात येतील.
न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, दिनेश महेश्वरी आणि संजीव खन्ना यांनी सीबीएसई मंडळाला परीक्षा रद्द करण्यासंबंधीचे पत्रक काढण्यास परवानगी दिली आहे. सॉलिसीटर जनरल तुषार मेहता म्हणाले, की विद्यार्थ्यांना बोर्डाच्या शेवटच्या तीन पेपरच्या गुणांवरून सरासरी काढून गुण दिले जातील. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा १ ते १५ जुलै दरम्यान घेण्याचे जाहीर केले होते.
परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले, की १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल १५ जुलैपर्यंत घोषित केले जातील.