मुंबई - जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वादरम्यान शहरातील तीन मंदिरे भक्तांसाठी खुले करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. दादर, भायखळा आणि चेंबूरमधील जैन मंदिर 22-23 ऑगस्टला उघडण्याची सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. तसेच मंदिर उघडल्यानंतर सर्वोतोपरी कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंदिर प्रंबधकांना सांगितले आहे.
न्यायालयाने सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. राज्य सरकारने मॉल्स आणि अन्य आर्थिक कामकाज सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, मंदिर सुरु करण्याची नाही, असे सुनावणी दरम्यान न्यायालयाने म्हटलं. तसेच सुनावणीमध्ये न्याधीशांनी जगन्नाथ रथ यात्रेचाही उल्लेख केला. महाराष्ट्र सरकार इतर गोष्टी सुरु करण्यास परवानगी देत आहे. मात्र, जेव्हा मंदिराचा प्रश्न येतो. तेव्हा ते कोरोनाच्या धोक्याविषयी बोललात जाते, असे सीजीआय म्हणाले.
दरम्यान, बॉम्बे उच्च न्यायालयाने 1 ऑगस्टला जैन समुदायाच्या लोकांना पर्युषण पर्वादरम्यान (15 ते 23 ऑगस्ट) मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी परवानगी देण्यास नकार दिला होता. कोरोना संकटामध्ये सार्वजनिक कर्तव्याचे पालन करणे गरजेचे आहे. एस. कथावाला आणि न्यायमुर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने अंकित वोरा आणि श्री ट्रस्टी आत्म कमल लब्धिशुरिश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्टच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी केली होती. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी झाली.