नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने जगन्नाथ रथ यात्रेला अखेर परवानगी दिली आहे. मात्र न्यायालयाने केवळ पुरीमधील रथ यात्रेला परवानगी दिली आहे. तसेच, भाविकांशिवाय ही रथ यात्रा आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २३जूनला होणाऱ्या या रथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाने 18 जूनला स्थगिती दिली होती. या निर्णयात बदल करण्यात यावा यासंबधीच्या चार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्यावर आज(सोमवारी) पुन्हा सुनावणी पार पडली.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. रविंद्र भट्ट यांच्यासमोर आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. याआधी 18 जूनला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठाने सुनावणी घेतली होती. कोरोना फैलावामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.
लोकांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेता, रथ यात्रा यावर्षी झाली नाही तर भगवान जग्गनाथ आपल्याला माफ करेल. यावर्षी रथ यात्रेला परवानगी देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.