लखनऊ - पालघरमध्ये झालेल्या हत्येचा देशभरातील साधूंनी निषेध केला आहे. आयोध्येतील साधूंनी या प्रकरणावर तीव्र रोष व्यक्त केला आहे. राममंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.
साधूंची हत्या करणारे लोक निश्चितच गुन्हेगारी प्रवृत्तीचे म्हणावे लागतील. त्यांना कठोर शिक्षा झाली नाही तर ही खूप निंदनीय बाब असेल. या प्रकरणी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी आचार्य सत्येंद्र दास यांनी केली.
समोर आलेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोलीसही उपस्थित होते. त्यांनी साधूंना वाचवण्याऐवजी आरोपींना मदत केली असे म्हटले जात आहे. ही बाब जर खरी असेल तर पोलिसांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, असे आचार्य दास म्हणाले.
मागच्या आठवड्यात पालघरमध्ये जूना आखाड्याचे कल्पवृक्ष गिरी महाराज आणि सुशील गिरी महाराज यांची जमावाने हत्या केली. या प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले आहेत. देशभरातील साधूंनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. मंगळवारी हनुमानगढी येथील साधू राजू दास महाराज धरणे आंदोलनाला बसले. त्यानंतर आता आयोध्येतील राममंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनीही आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.