गांधीनगर - देशभरात होळीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे. विविधेत एकता असलेल्या देशात होळीचा सण साजरा करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. धुलीवंदनाच्या पूर्व रात्रीला देशात होलिका दहन करण्याची प्रथा आहे. गुजरातच्या सरस येथे मात्र होलिका दहन करण्याची एक वेगळी आणि आश्चर्यकारक प्रथा आहे.
सरस येथे होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. येथील होळीचे वैशिष्ट म्हणजे येथील लोक होळी पेटवल्यानंतर निर्माण होणाऱ्या निखाऱ्यांवर धावतात. विशेष म्हणजे निखाऱ्यावरून धावल्यामुळे त्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारची इजा होत नाही, असा दावा येथील नागरिक करतात.
होळीच्या निखाऱ्यावरून धावल्याने वाईट शक्तींपासून त्यांचे रक्षण होते. देवाची त्यांच्यावर कृपा राहते अशी त्यांची श्रद्धा आहे. धावताना हे लोक आपल्या कुटुंबीयांच्या उज्वल भविष्याची कामना करताना दिसतात.
धगधगत्या निखाऱ्यावरुन धावण्याची पद्धतही आपणासाठी काही नवीन नाही. काही सेंकदापर्यंत उष्णता सहन करण्याची क्षमता आपल्या त्वचेमध्ये असते. त्यामुळे पेटलेल्या निखाऱ्यावरुन धावल्याने काही होत नाही. विज्ञानाने हे सिद्धही केले असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. तसेच गर्दीच्या जागी अशाप्रकारच्या कृत्यांमुळे अनेकवेळा अपघातही झालेले समोर आले आहेत. मात्र, लोकांचीही होळी उत्सवातील ही श्रद्धा त्यांना अशा गोष्टीपासून त्यांना परावृत्त करु शकत नसल्याचे वास्तव सरस येथे पाहायला मिळते.