लखनौ - राम मंदीर निर्माण करण्याच्या कामामध्ये सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. काँग्रेसचे नेते राहुल गांधीसुद्धा श्रद्धाळू आहेत. तसेच एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनीही रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला यावे असेही संजय राऊत म्हणाले.
आम्ही गेल्या ५ दिवसांपासून अयोध्येत आहे. आम्हाला कोण विरोध करत असल्याचे दिसले नसल्याचेही वक्तव्य संजय राऊत यांनी केले. ते आज (शनिवार) साडेचार वाजता उद्धव ठाकरेंसोबत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर कोरोना व्हायरसचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर शरयू नदी किनारी होणारी महाआरती न घेण्याचा निर्णय घेतल्याचे संजय राऊत म्हणाले.
आमचं सरकार १५ वर्ष टीकणार
महाविकास आघाडीचे सरकार हे त्यांचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. पुढचे १५ वर्ष हे सरकार टीकणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.