भोपाळ - कोरोना संसर्गामुळे देशात आत्तापर्यंत १ हजार ३०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना सरकारला विषेश काळजी घ्यावी लागत आहे.त्यासाठी सरकारने नियमावली घालून दिली आहे. फक्त काही ठराविक नातेवाईकांनाच अंत्यसंस्काराला येण्याची परवानगी देण्यात आली आहे. अनेक अंत्यसंस्कार कुटुंबीयांविनाही होत आहेत. अशा परिस्थितीत इंदौर शहरात सफाई कर्मचारी अंत्यसंस्कार करण्यास मदत करत आहेत.
इंदौर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला आहे. शहरामध्ये रविवारपर्यंत १ हजार ५६८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. 'मृत व्यक्ती हिंदू, मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्माचा असो आम्ही अंत्यसंस्कारास मदत करतो. आमचं त्यांच्यासोबत कोणतही नातं नाही. मानवतेच्या दृष्टीकोनातून आम्ही हे काम करतो', असे अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथील सफाई कर्मचारी सोहनलाल खटवा (५०) यांनी सांगितले.
'अनेक पार्थिवांना तर आम्हीच मुखाग्नी दिला आहे. कारण, कुटुंबीय संसर्गाच्या भीतीने पार्थिवाजवळ येण्यास घाबरतात. अनेकांचा दफनिधीही आम्हीच केला. कुटुंबीयांनी ज्या पद्धतीने अंत्यविधी केला असता, तेच काम आम्ही पार पाडत आहोत, असे सोहनलाल म्हणाले.
'जर कोणी कुटुंबीय अंत्यसंस्काराला आले तर त्यांना मृतदेहापासून ठराविक अंतरावर थांबावे लागते. सर्व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळावे लागतात. तसेच अंत्यसस्कार पार पडल्यानंतर तत्काळ तेथून जावे लागते. आम्ही नातेवाईक आणि कुटुंबीयांची असहाय्यता समजून घेतो. आमचीही मुलंबाळ आहेत. आम्हालाही भीती वाटते. मात्र, आता आम्हाला अंत्यसंस्कार करण्याची सवय झाली आहे, असे खटवा यांनी सांगितले.