चंदिगड -समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी पंचकुलातील एनआयए न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने स्वामी असिमानंदसह सर्व ४ आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. या बॉम्बस्फोटात ६८ लोकांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी समझौता एक्सप्रेस ब्लास्टप्रकरणी पाकिस्तानच्या महिला राहिला वकील यांची याचिका रद्द केली आहे. यानंतर न्यायालयाने याप्रकरणी आपला निर्णय दिला.
हरियाणाच्या पंचकुलातील एनआयए न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. गेल्या १४ मार्च रोजी याप्रकरणी सुनावणी होणार होती. मात्र, राहिला यांनी ई-मेल करत याचिका दाखल केली. यानंतर न्यायालयाने आपला निर्णय टाळला. आपण याप्रकरणी साक्ष देऊ इच्छित आहोत, असे राहिला यांनी आपले वकील मोमिन मलिक यांच्या माध्यमातून सांगितले होते.
काय आहे प्रकरण -
भारत-पाकदरम्यान धावणाऱ्या समझौता एक्सप्रेसमध्ये १८ फेब्रुवारी २००७ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यात ६८ लोकांचा मृत्यू झाला होता, तर १२ जण गंभीर जखमी झाले होते. ट्रेन दिल्लीवरुन लाहोरला जात होती. मृतांमध्ये पाकिस्तानी नागरिकांची संख्या अधिक होती. मृत ६८ लोकांमध्ये १६ लहान मुलांचा समावेश होता. हरियाणातील पानीपत जिल्ह्यातील चांदनी बाग ठाणे परिसरातील सिवाह या गावच्या दिवाना स्टेशनजवळ स्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटप्रकरणातील सर्व आरोपींविरोधात पंचकुलाच्या विशेष न्यायालयात केस सुरू होती.