पणजी - अर्थसंकल्प 2020 मुळे थेट विदेशी गुंतवणूक वाढणार असल्याने भारत लवकरच ब्रिटन आणि जर्मनी यांना मागे टाकणार असल्याचे भाकित भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. ते पणजीमध्ये गोवा भाजपने अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या चर्चा सत्रात बोलत होते.
चर्चा सत्रात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. पात्रा म्हणाले, 'नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून विरोधक सरकारला झुकवू पाहत आहेत. परंतु, हा कायदा नेहरू लियाकत करारानुसार आणि भारतीय संविधानाच्या 11 व्या कलमानुसार तयार करण्यात आलेला आहे. जो नागरिकत्व देणारा आहे.'
पुढे अर्थसंकल्पावर बोलताना पात्रा म्हणाले, भाजप सरकार 2014 मध्ये सत्तेत येईपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 2 ट्रिलीयन होती, जी मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात 2.9 ट्रिलीयन झाली म्हणजे या कार्यकाळात ती अजून 2 ट्रिलीयन उडी घेत 5 ट्रिलीयनचा टप्पा गाठू शकते.
अर्थसंकल्पात यावेळी मध्यवर्गाच्या करार कपात केली आहे. ज्यामुळे सरकारला 48 हजार कोटींचे नुकसान होणार आहे. म्हणजे ती रक्कम सरकार भरणार आहे. भारत आता विकसनशीलतेकडून विकसित राष्ट्र म्हणून वेगाने वाटचाल करत आहे. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना पात्रा यांनी उत्तरे दिली.
भारत ब्रिटन जर्मनीला मागं टाकणार -
अर्थसंकल्प 2020 मुळे थेट विदेशी गुंतवणूक वाढणार आहे. शेतमालाच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे. तसेच कार्पोरेट करार कमी केल्यामुळे विदेशी गुंतवणूक वाढणार आहे. देशाला पुढे नेण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढविणे गरजेचे असते. भाजप सरकारने ते केले आहे. त्यामुळे भारत लवकरच ब्रिटन आणि जर्मनी यांना मागे टाकणार असल्याचे पात्रा म्हणाले.
मोदींनी अशक्य वाटणारे निर्णय घेतले -
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार अस्तित्वात आल्यानंतर अनेक मोठमोठे अशक्य वाटणारे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी विरोधक केवळ सरकारच नव्हे तर देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही पात्रा यांनी केला आहे.