मुंबई- 14 एप्रिल रोजी वांद्रे येथे जमलेली परप्रांतीय मजुरांची गर्दी हे एक मोठे षडयंत्र आहे. त्यामागचे सूत्रधार लोकांना समजतील, त्यांना आम्ही शोधून काढू मात्र कोरोनाच्या संधीचा फायदा घेऊन राज्य सरकार खिळखिळे करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्या कपाळावर सरकारला खिळा ठोकावा लागेल, असा इशारा शिवसेनेने सामनाच्या संपादकीय मधून दिला आहे. “सरकारला अडचणीत आणण्याची संधी विरोधक सोडत नाहीत. त्यासाठी ते कितीही खालच्या पातळीवर जायला तयार आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीस छेद देणारे हे प्रकार आहेत. जणू महाराष्ट्राशी व येथील लोकांशी आपले काही देणेघेणेच नाही अशा पद्धतीने विरोधी पक्ष वर्तन करीत असेल तर ते उरलेली पतही गमावून बसतील,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.
वांद्रे स्थानकाबाहेरील गर्दी हे एक षडयंत्र
“मुंबईतून परराज्यांमध्ये जाणाऱ्या गाड्या फक्त वांद्रय़ावरूनच सुटत नाहीत. त्या लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा रेल्वे स्थानकांवरूनही सुटतात. पुणे, नागपुरातूनही सुटतात; पण गर्दी जमा केली गेली ती फक्त वांद्रे स्थानकाजवळ. काही (हिंदी) वृत्तवाहिन्यांवरही फक्त वांद्रे येथील मंगळवारच्या गर्दीवरच चर्चेची गुऱ्हाळे चालवली गेली. या गुऱ्हाळांमध्ये सुरत येथे परप्रांतीय मजुरांचा जो उद्रेक झाला त्याचा साधा उल्लेखही होत नाही. हा काय प्रकार म्हणायचा? हे मोठे षड्यंत्र आहे
देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागावा
“मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर मंगळवारी संध्याकाळी अचानक हजारो परप्रांतीय मजूर जमले आणि त्यांनी धिंगाणा घातला. आपापल्या राज्यांत जाण्यासाठी रेल्वेतर्फे विशेष गाड्या सोडणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि लगेच ही गर्दी उसळली. गाडय़ा सोडण्याबाबत ‘अफवा’ पसरली असे आम्ही सांगत नाही. ती बातमीच आहे. कारण अशा गाड्या सोडण्याबाबतचे रेल्वेचे एक परिपत्रकच समोर आले आहे. म्हणजे अफवा उठली आणि लोकांनी गर्दी केली असे म्हणता येत नाही. दुसरे असे की, 15 एप्रिलनंतरच्या तारखांसाठी रेल्वेने रिझर्व्हेशन कसे घेतले? पंतप्रधान ‘लॉक डाऊन’ उठवणार की आणखी काही करणार याबाबत संभ्रम असताना रेल्वे 40 लाख लोकांचे रिझर्व्हेशन घेऊन गोंधळ उडवते हा अपराध आहे. त्यामुळे वांद्रय़ात जी गर्दी उसळली, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यास रेल्वे मंत्रालय जबाबदार आहे व त्याबद्दल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागणार आहेत काय?,” सामनातील चले अपने गाव! त्यांना खिळा ठोका या अग्रलेखातून शिवसेनेने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्र्याच्या राजीनामा मागावा, असे आव्हान दिले आहे.
हातावर पोट असलेला ‘भारत’ उद्रेकाच्या स्थितीत
“रेल्वे खात्यातील सावळ्या गोंधळामुळे मंगळवारी मुंबईत जे घडले तो लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अघोरी प्रकार आहे. जे मुंबईतील वांद्रय़ात घडले तोच प्रकार मोदी-शहांच्या सुरतमध्ये घडला. तेथील हिऱ्याच्या कारखान्यांमध्ये काम करणाऱया हजारो परप्रांतीय मजुरांनादेखील त्यांच्या घरी जायचे आहे. ‘लॉक डाऊन’मुळे त्यांचे खाण्यापिण्याचे वांदे झाले. सरकारी मदतीचे बुडबुडेही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. हे सत्य असेल तर भविष्यातील वणव्याची ही ठिणगी पडली आहे असे आम्ही समजतो,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
“14 एप्रिल रोजी सकाळी देशाचे लोकप्रिय आणि कार्यक्षम पंतप्रधान मोदी हे ‘बंद’चा कालावधी वाढवल्याची घोषणा करतात, जनतेने 3 मेपर्यंत घरातच थांबावे असे आवाहन करतात आणि मोदींचे भाषण संपताच मुंबई, सुरतसह अनेक शहरांतील मजूरवर्ग रस्त्यावर उतरतो हे भयंकर आहे. म्हणजेच नेत्यांच्या भाषणांनी पोट भरत नाही व सरकारी मदतीवर लोक संपूर्णतः खूश नाहीत. त्यांचा जगण्या-मरण्याचा संघर्ष वेगळा आहे. हातावर पोट असलेला ‘भारत’ उद्रेकाच्या स्थितीत आहे. ‘इंडिया’ नावाचा देश कोरोनाच्या विरोधात थाळ्या वाजवत दिवे पेटवत असेल, पण ‘भारत’ मात्र पोटातील आगीवर पाणी कसे मारता येईल या विवंचनेत आहे. ही विवंचना आज सगळय़ाच क्षेत्रांत आहे. लहान-थोर आणि गरीब-श्रीमंतांनादेखील ती भेडसावत आहे. सगळय़ांचेच बारा वाजले आहेत. पण गरीबांच्या संदर्भात सरकारला वेगळी भूमिका घ्यावी लागेल,” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांची काळजी घेत आहेत. त्यामुळे सर्वांनी आहे तिथेच राहावे, असे आवाहन शिवसेनेने केले आहे.
ज्याने पोटापाण्याची व्यवस्था केली ते राज्य सोडून पळून जाणे ही बेईमानी
“मुंबईसारखी शहरे ‘बंद’ पडतात तेव्हा देशाचे पोट उपाशी राहते याचा अनुभव सध्या येत आहे. देशाचा आर्थिक डोलारा कोसळतो आहे. अर्थात, पैशाचे सोंग आणता येत नाही हेसुद्धा तितकेच खरे. अशा परिस्थितीत राज्य चालवणे जिकिरीचे काम आहे. म्हणून कालपर्यंत ज्याने पोटापाण्याची व्यवस्था केली ते राज्य सोडून पळून जाणे ही बेईमानी आहे. जे संकटकाळात येथे राहिले तेच महाराष्ट्राचे भूमिपुत्र. जे गोंधळ घालून पळून जात आहेत ते पुन्हा येथे येणार नाहीत याची तजवीज प्रशासनाने आता केलीच पाहिजे,” अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.
घरी जाणाऱ्यांच्या हाती साधी वळकटीही कशी नसावी?
“वांद्रे येथे पाच-दहा हजार लोक जमवले गेले त्यांचे कूळ अणि मूळ शोधून काय करायचे ते पाहावे लागेल. त्यांनी ‘लॉक डाऊन’चे सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसविले. सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजविले. महाराष्ट्राच्या जिवाशीच खेळण्याचे हे प्रयत्न होते. अर्थात, येथे प्रश्न येतो तो इतके लोक जमा होईपर्यंत पोलीस काय करीत होते? संबंधित भागात ‘लॉक डाऊन’आहेच. रस्त्यावर येणाऱयांच्या पार्श्वभागावर पोलीस फटके मारीतच असतात. मग दहा हजार लोकांचा जमाव जमतो कसा? नेमके याच वेळी कोणी ‘लॉक डाऊन’ उठवले होते काय? दुसरे असे की, हे लोक आपापल्या गावी जाण्यासाठीच जमले होते ना? मग त्यांच्या हाती साधी वळकटीही कशी नसावी?,” असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.