रांची - भाजपमधील भगवी वस्त्रे घालून फिरणारे अविवाहित पुरुष हे महिलांवर अत्याचार करण्यात पुढे आहेत, असा आरोप झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी केला. ते झारखंडमधील एका सभेत बोलत होते.
आज आपल्या देशातील मुलींना जाळले जात आहे. मला असे समजले, की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी देखील भगवी वस्त्रे घालून इकडे-तिकडे फिरत आहेत. भाजपमधील हे लोक लग्न करत नाहीत, मात्र भगवी वस्त्रे घालून देशातील महिलांची अब्रू लुटण्याचे काम करत आहेत, असे सोरेन म्हणाले.
झारखंडमध्ये सुरु असलेल्या निवडणुकांमधील मतदानाचा पाचवा टप्पा पार पडणार आहे. त्यासाठी होत असलेल्या प्रचाराचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे या सभेचे आयोजन करण्यात आले होते यासोबतच, त्यांनी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. भाजपचे लोक तुम्हाला एनआरसी आणि सीएएच्या मुद्द्यावरून मतदान करण्यास सांगतील. मात्र, ते सरदार पटेल यांचे नावही काढणार नाहीत. त्यांना सरदार पटेल, आणि श्रीरामाशी काहीही घेणे-देणे नाही. त्यांना फक्त धर्माच्या नावाने लोकांमध्ये फूट पाडायची आहे, असे ते म्हणाले.
झारखंड निवडणूकांच्या पाचव्या, म्हणजेच शेवटच्या टप्प्यासाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर, २३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा : निर्भया प्रकरण : दोषी पवन गुप्ताच्या याचिकेवरील सुनावणी आजच होणार