जयपूर - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेले राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची प्रकृती बिघडली आहे. कोरोनामुळे त्यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार होणार आहेत.
सचिन पायलट यांना 12 नोव्हेंबरला कोरोनाचे संक्रमण झाले होते. त्यांच्यावर जयपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. एचआरसीटी टेस्टनंतर त्यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला.
या नेत्यांचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोनामुळे भारतात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या महामारीत अनेक दिग्गज नेत्यांचेही कोरोनामुळे निधन झाले. अहमद पटेल यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथून खासदारकी भूषवलेले एच. वसंतकुमार यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. भाजपचे नेते सुरेश अंगडी यांचेदेखील सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे निधन झाले.
राजस्थानात 28 हजार 183 सक्रिय रुग्ण -
राजस्थान सरकारचे मंत्री आणि नेते एकामागून एक कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री उदयलाल आंजना कोरोनाची लागण झाली होती. गुर्जर चळवळीचे संयोजक गुर्जर नेते कर्नल किरोरी बैन्सला यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. राजस्थानात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 28 हजार 183 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. 2 हजार 255 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. राजधानी जयपूरसह इतर ठिकाणी कोरोना संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
हेही वाचा - चलो दिल्ली आंदोलन : आंदोलकांना दुसऱ्या दिवशी मिळाला दिल्लीत प्रवेश