बंगळुरू - कर्नाटक सरकारने आज(रविवारी) आंतरराज्य आणि राज्यांतर्गत प्रवासावरील बंधने हटवले आहे. त्यामुळे प्रवासी आणि मालाची ने-आण करण्यास कोणतीही विशेष परवानगी लागणार आहे. टप्याटप्याने लॉकडाऊन हटवण्याच्या नियोजनांतर्गत सरकारने हे पाऊल उचलले आहे.
राज्याचे मुख्य सचिव टी. एम विजयन यांनी यासंबधी आदेश जारी केला असून तो तत्काळ लागू करण्यात आला आहे. हा निर्णय घेताना गृह मंत्रालयाची नियमावलीही विचारात घेण्यात आली आहे. 30 जून 2020 पर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी कोणत्याही विशेष परवानगीची गरज नाही. राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि आरोग्य लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. तर कर्नाटकात इतर राज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी वेगळा आदेश काढण्यात येणार आहे.
पाचव्या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थना स्थळे, हॉटेल, रेस्टॉरेंट, मॉल आणि इतर सेवा क्षेत्रातील आस्थापने 8 जूनपासून सुरु करण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था सुरु करायच्या किंवा नाही याचा निर्णय जुलै महिन्यात चर्चेअंती घेण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.