हैदराबाद - पोलीस महासंचालक एम. महेंद्र रेड्डी यांनी म्हटले आहे की, अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी जाताना नागरिकांना त्यांच्या राहत्या घराचा पुरावा सोबत ठेवणे बंधनकारक आहे. लोकांनी त्यांच्या घरापासून तीन किलोमीटरहून दूरच्या परिसरात फिरु नये, असेही त्यांनी आदेश दिले आहेत.
सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रेड्डी म्हणाले, तेलंगणा सरकारने लॉकडाऊन ७ मेपर्यंत वाढवला आहे. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी डीजीपी ऑफिसमध्ये बैठक पार पडली. ज्यात वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
आता नागरिकांनी घरातून बाहेर पडताना आपल्या घराचा पत्ता सोबत ठेवणे गरजेचे आहे. कोणीही आपल्या घरापासून ३ किलोमीटरपेक्षा जास्त दूर जाऊ नये यासाठी हा नियम करण्यात आला आहे. ३ किलोमीटरच्या आतील दुकानांतच अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करावी. आजारी असल्यास जवळच्याच रुग्णालयात तपासणी करावी. तर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जायचे असल्यास सूट दिली जाणार आहे, असे रेड्डी यांनी सांगितले.
रेड्डी यांनी सांगितले, की त्यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे, की आपल्या कर्तव्यावर जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पास देण्यात यावेत. यावर त्यांचा पत्ता आणि कामाचे ठिकाण नमूद केलेले असावे. जेणेकरुन या पासचा गैरवापर करुन कोणीही इतरत्र फिरु नये. रेड्डी यांनी सांगितले, की लॉकडाऊनदरम्यान तेलंगणातून आतापर्यंत सुमारे १ लाख २१ हजार गाड्या जप्त केल्या गेल्या आहेत.