पणजी - वंदे भारत मोहिमेअंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज गोव्यातील ३३७ समुद्री प्रवाशांना इटलीहून परत आणण्यात आले. बुधवारी सकाळी १६८ नागरिकांना घेऊन एक विमान दाखल झाले, तर दुपारी तीनच्या सुमारास १६९ नागरिकांना घेऊन दुसरे विमान गोव्यात दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, एम/एस कोस्टा क्रूज कंपनीमध्ये काम करणारे ४१४ गोवेकर हे इटलीमध्ये अडकले आहेत. या सर्वांना परत आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर, आज यातील पहिल्या दोन बॅचेस गोव्यात दाखल झाल्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनबाबत असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. तसेच या सर्व लोकांची कोरोना चाचणी करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गोवा विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी दिली आहे.
याठिकाणी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पथके तैनात आहेत. सकाळी आलेल्या लोकांच्या जाण्यानंतर आम्हाला पूर्ण विमानतळाचे सॅनिटायझेशन करणे गरजेचे आहे. कारण दुपारी आणखीही लोक येणार आहेत. या सर्वांच्या खाण्या-पिण्याची तसेच वैद्यकीय चाचणीची व्यवस्थाही विमानतळावर करण्यात आली आहे, असेही मलिक यांनी सांगितले.
हेही वाचा : 'वंदे भारत मोहीम' : थायलंडमध्ये अडकलेले भारतीय आज येणार मायदेशी..