नवी दिल्ली - पंतजली कोरोनिलच्या विरोधात चेन्नईच्या अरूद्रा इंजिनियरिंगने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. चेन्नईच्या कंपनीने अगोदर मद्रास उच्च न्यायालयात आपला दावा स्पष्ट करावा, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्यायाधीश ए. एस. बोपन्ना व व्ही रामसुभ्रमन्यम यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना याचिका काढून घेण्यास सांगितले आहे. चेन्नईच्या कंपनीने मद्रास उच्च न्यायालयातच आपले प्रकरण सुरू ठेवावे. या प्रकरणी उच्च न्यायालयात ३ सप्टेंबरला सुनावणी घेतली जाईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
चेन्नईच्या अरूद्रा इंजीनियरिंगने 'कोरोनिल' हा ट्रेडमार्क ते १९९३पासून वापरत आहेत. अवजड औद्योगीक मशीन्स आणि रासायनिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱया द्रव्याचे 'कोरोनिल' हे नाव या कंपनीने १९९३लाच ठेवले होते. पंतजली 'कोरोनिल' हेच नाव वापरून आपले औषध विकत आहे. याला अरूद्रा इंजीनियरिंगने विरोध करत मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने 'कोरोनिल' ट्रेडमार्क वापरण्यासाठी पंतजलीला बंदी घातली होती व १० लाखांचा दंडही सुनावण्यात आला होता.
यानंतर मात्र, चेन्नईच्या अरूद्रा इंजीनियरिंगने सर्वोच्च न्यायालयातही आपली याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.