नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा बरे होण्याचा दर झपाट्याने वाढत असून 60 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारे मिळून काम करत आहेत. 1 लाख 19 हजार 696 आणखी रुग्ण बरे झाले असून आता कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे.
कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 125 असून 3 लाख 34 हजार 821 जण बरे झाले आहेत. मागील 24 तासांत देशात 13 हजार 99 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर आता 59.07 वर पोहोचला आहे, असेही स्पष्ट केले.
कोरोना संसर्गाची चाचणी करण्यासाठी देशात प्रयोगशाळांची संख्या दिवसेंदिवस वाढवण्यात येत आहे. सद्यस्थितीत देशात 1 हजार 49 प्रयोगशाळा आहेत. त्यामध्ये 761 सरकारी तर 288 खासगी आहेत. 29 जूनपर्यंत देशात 86 लाख 8 हजार 654 नमुने तपासण्यात आले तर सोमवारी एकाच दिवसात 2 लाख 10 हजार 292 नमुने तपासण्यात आले, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.