नवी दिल्ली - देशभरामध्ये काल (मंगळवारी) विक्रमी संख्येने कोरोनाची नमुन्यांची तपासणी करण्यात आली. एकाच दिवसात तब्बल 3 लाख 20 हजार नमुने तपासण्यात आले. 14 जुलैपर्यंत (मंगळवार) देशात 1 कोटी 24 लाख 12 हजार 664 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने सांगितले.
दर दहा लाख नागरिकांमागे कोरोना चाचण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या हे प्रमाण 8 हजार 994.7वर पोहचले आहे. काल (मंगळवार) दिवसभरात 3 लाख 20 हजार 161 एवढे नमूने तपासण्यात आले. आत्तापर्यंतची ही एकाच दिवसात विक्रमी तपासणी आहे, असे आयसीएमआरचे शास्त्रज्ञ आणि माध्यम समन्वयक डॉ. लोकेश शर्मा यांनी सांगितले.
25 मेपर्यंत दरदिवशी चाचणी करण्याची क्षमता सुमारे दीड लाखांपर्यंत होती. मात्र, आता हे प्रमाण चार लाखांजवळ पोहचले आहे, असे शर्मा म्हणाले. मागील 24 तासात देशात सर्वात जास्त 29 हजार 429 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 9 लाख 36 हजार 181वर गेली आहे. तर मृतांची संख्या 24 हजार 309 झाली आहे. 582 रुग्णांचा मागील 24 तासात मृत्यू झाला.
कोरोना संशयीतांची निगराणी आणि चाचणी व्यापक प्रमाणात करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या नियमावलीत म्हटले आहे. लॅबचे जाळे तयार होत असल्याने देशात कोरोनाग्रस्तांच्या चाचण्या जास्त होण्यास सुरुवात झाली आहे. खासगी आणि सरकारी लॅब मिळून 1 हजार 223 लॅब देशात आहेत.